Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे

सांगली

गेली कित्येक वर्ष या देशात काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली आहे. त्यानंतर २०१४ साली भाजप सत्तेवर आली. काँग्रेस आणि भाजप या दोघांनीही आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महागाई, बेरोजगारी कमी करू, शेतकऱ्यांना न्याय देऊ, महिला सक्षमीकरण करू असली पोकळ आश्वासने देऊन भारतातील भोळ्या भाबड्या जनतेला फसविण्याचे काम केले आहे. जनतेचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेस, भाजपच्या या फसव्या राजकारणाला लोक कंटाळून गेली आहेत. भारतीय जनता पक्ष जाती धर्माचे विद्वेषी राजकारण करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे तसेच काँग्रेस पक्ष हा भाजप पक्ष तुम्हाला त्रास देईल म्हणून तुम्ही आम्हाला सत्ता द्या अशी बतावणी करत आहे. आमदार खासदारांची परिस्थिती सुधारली पण जनता मात्र अद्यापही उपाशी आहे. आमदार खासदारांची मुले विदेशात उच्च शिक्षण घेत आहेत पण सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण न परवडणारे झाले आहे. लोकांना रोजच्या भाकरीची भ्रांत निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, त्याच कुटुंब भिकेला लागलं आहे. महिला सक्षमीकरण व सबलीकरण प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, ओबीसींची जातनिहाय जनगणना अजूनही झाली नाही, विद्वेषी धार्मिक राजकारण थांबवणारे व समाजात शांतता प्रस्थापित करणारे मोहमद पैगंबर बिल अजूनही पारित झाले नाही. हे सर्व प्रश्न अद्यापही कायम आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे मैदानात उतरले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वचननामा घेऊन घरोघरी पोहोचत आहेत. सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेला ३ लाख २५ हजार मते वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. यंदाही सांगली लोकसभा व सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे असा प्रस्ताव राज्य कमिटीला वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे असे माहिती वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.