सोलापूर,7 मे
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे कर्नाटक येथील प्रचाराला जात होते. तेव्हा त्यांनी सोलापुरमध्ये विश्रांती घेतली. आज सकाळी आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोलापुरातील आरपीआय नेते राजा सरवदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी भेटीगाठी घेतल्या. राजा सरवदे यांच्या कार्यालयाचे उदघाटन केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार घेऊन आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.
अजित पवार हे भाजपसोबत जातील : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सरकार आली आहे. उद्धव सेनेच्या वतीने एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर देखील सुनावणी सुरू आहे. लवकरच त्यावर अंतिम निर्णय येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोर्टाचा निर्णय एकनाथ शिंदे विरोधात लागला तर सरकार पडेल, अशीही चर्चा राज्यात सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपसोबत जातील अशीही माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंचे मोदींच्या नेतृत्वाखाली काम : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींंवर टीका केली. मोदी हे देशाला लागलेली हुकूमशाहीवृत्ती आहे, असे सांगितले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे देखील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत होते. या अगोदर उद्धव ठाकरे असे म्हणत होते की, नरेंद्र मोदी हे देशाची लोकशाही मजबूत करत आहेत. लोकशाही धोक्यात आणणे, या उद्धव ठाकरेंच्या आरोपात काहीही तथ्य नाही, अशी आठवले यांनी माहिती दिली.