Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेलेल्या भूमिगत गॅस पाइप लाईनला अचानकपणे आग लागली. आगीत एक दुचाकी आणि रस्त्याकडेला असलेले झाड जळाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
इचलकरंजी शहरातील विविध भागात भूमिगत गॅस पाइपलाईन टाकण्यात आली आहे. अशीच पाइपलाईन पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास गॅस पाइपलाईनमधून अचानकपणे गॅस गळती सुरु होऊन आगीचा भडका उडाला. अचानकपणे घडलेल्या या घटनेने रस्त्यावरुन येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांची तारांबळा उडाली. या आगीच्या ज्वाळा सुमारे 20 ते 25 फुटापर्यंत उंच होत्या. रस्त्यालगत असलेल्या एका दुचाकीलाही या आगीची झळ बसली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.