Spread the love

इचलकरंजीत भुलभुलय्याथ : एका सहकारी बँकेतून हलत आहेत सूत्रे

सिटी रिपोर्टर /महान कार्य वृत्त सेवा

खासगी कंपन्यांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधीची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असतानाच आता हाच फंडा वापरून इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या काही बड्या पुढाऱ्यांनी
एक लाख गुंतवणूक करा आणि एक कोटी मिळवा अशी वस्त्रनगरीला भूरळ घातली आहे.
इचलकरंजीतील एका नामांकित सहकारी बँकेतून याची सूत्रे हलवली जात आहेत.
या भुलभुलय्याच्या मायाजालात अडीचशेहून अधिकजण अडकल्याची चर्चा आहे. या प्रकरणात शहरातील काही स्टँप विक्रेत्यांचाही हात असल्याचे कळते. सध्या हा गुपचुप व्यवहार सुरु असला तरी नजीकच्या काही दिवसातच मोठे रॅकेट समोर येईल. अशी शिवतिर्थापासून गांधी पुतळ्यापर्यंत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
संचयनी, शांतीदूत, पल्स. पियरलेस, क्रिप्टो करन्सी, ए. एस. ट्रेडर्स, सहारा एक्सपोर्ट, गोल्ड आदी बनावट कंपन्यानी वेगवेगळ्या भूरळ घालणार्‍या योजना अणून करोडो रुपयांची माया गोळा करुन पोबारा केला. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली जिल्ह्यातील हजारो कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. ही सारी उदाहरण डोळ्यासमोर असूनही इचलकरंजी शहरातील लोकांनी डोळे झाकून पांढऱ्या कपड्यातील पुढार्‍यांकडे गुंतवणूक केल्याचे वृत्त आहे.

आतापर्यंत अडीचशेहून अधिक जणांनी यात पैसे गुंतवल्याचे कळते. काहींनी तर एक कोटीला भुलून खासगी सावकाराकडून कर्ज काढून गुंतवणूक केल्याचे समजते. एक लाख गुंतवल्यावर एक कोटी कधी मिळणार हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. हा व्यवहार काही कोटींच्या घरात पोहचला असल्याचे समजून येते.
गुंतवणूकदरांचा विश्‍वास बसण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर चार ओळींचा करारही केला जातो. परंतु करारासाठी वापरलेले स्टँप दोन खास व्यक्तींच्या नावावर वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्ते म्हणून खरेदी केलेले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्ती इचलकरंजी शहरापासून 400 किलोमीटरवरील गरम हवेच्या नगरीतील असल्याचे कळते. कराराच्या स्टॅम्प पेपर गुंतवणूकदारांची सही झाल्यानंतर स्टॅम्प पेपर त्या दोन व्यक्तींकडे पाठवण्यासाठी खास व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे.

ज्या बँकेतून या प्रकरणाची सूत्रे असतात ती बँक शहरातील नावाजलेली संस्था आहे. बँकिंग क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त केलेल्या बँकेतून सूत्रे हलत असल्यामुळे गुंतवणूकदारही सहज विश्वास ठेवून व्यवहार करत आहेत. जिल्ह्याच्या एका मोठ्या बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या एक अधिकारी सल्लागाराच्या भूमीकेत असल्याचे कळते.
एकुणच या व्यवहारावर जानकारांनी मात्र खासगीत संशय व्यक्त केल्याचे समजते. काही दिवसात या प्रकरणातील मोठा भांडाफोड होणार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे.