इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजीतील रस्त्यावर भरणाऱ्या बाजार म्हणजे, कष्टकरांच्या दिवाळीचा माहोल असतो. आणि हाच त्यांचा आनंदोत्सव. परंतू ‘एका‘ संघटनेचा आधार घेवून काहीजन तीन चार वर्षापासून मॉल संस्कृतीमधील व्यापाऱ्यांची ‘सुपारी’ घेतल्यासारखी ‘पटवा-पटवी’ची दुकानदारी सुरू केली आहे. कागदी, ‘मेळ’ला यश आलं नाही हे लक्षात आल्यानंतर काहींना पुढे करून व्यवस्थेकडे तक्रार केली. परंतू या सर्व भानगडींना कात्रजचा घाट दाखवत कष्टकऱ्यांसाठी शिवतीर्थ ते गांधी पुतळा पर्यंत मुख्य रस्त्यावर आणि रस्त्याच्या मध्यभागी बाजार बसवलाच. अनुचित प्रकार घडेल अशी भिती दाखवत कागदी भेंडोळं गावभर मिरवणाऱ्यांना हा मोठा दणका मानला जातो.
इचलकरंजी शहर ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. आठ तास बारा तास काम केल्यानंतरच चुल पेटते. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळची चुल पेटवण्याची दिवस उजाडल्यापासून यंत्रमाग, हमाली आणि अन्य व्यवसायात मोल मजुरी करण्याची धावपळ उडते. वर्षातून एकदा येणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी किमान चार दिवस आनंचाते असतात. मालक लोकांकडून त्यांचा हिशोब झाल्यानंतर दिवाळी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या हातात बोनस रुपाने खुशाली देत असतात. मुला-बाळांना कपडे, दिवाळीचा फराळ खरेदी करण्यासाठी लगबग उठते. परंतू हाय फाय मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याची ऐपत नसते. त्यामुळे रस्त्यावर भरणारा बाजार हा त्यांना मोठा आधार असतो. आणि ही परंपरा गेली कित्येक पिढ्यपिढ्या सुरू आहे. परंतू गेल्या तीन चार वर्षापासून हा गरीबांचा बाजार मोडीत काढण्याची उठाठेव सुरू आहे.
गत वर्षी याच कारणावरून मोठी खडाजंगी झाली होती. परंतू येथील लोकप्रतिनिधींच्या अक्रमकपणामुळे गरीबांचा बाजार भरला. यंदाही हा बाजार उठवण्याचा घाट घातला होता. परंतू आमदार राहूल आवाडे, आयुक्त पल्लवी पाटील यांच्या वेळीच समन्वय झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा याठिकाणी बाजार भरला. तरीही कुरापती थांबलेल्या नव्हत्या. वरीष्ठापर्यंत धाव गेल्या. परंतू किरकोळ विक्रेत्यांनी गरिबांचा बाजार रस्त्याच्या मध्यभागी थाटून कष्टकऱ्यांची दिवाळी सुखकर केली.
सर्व काही सुरळीत…
याठिकाणी बाजार भरवू नये म्हणून आपत्कालीन गोष्टी घडतील अशी पुष्टी जोडली जात होती. हा प्रकार म्हणजे आजार होण्यापुर्वीच उपचार घेणे असेच म्हणावे लागेल. ना आपत्कालीन घटना घडली, ना कुणाला त्रास झाला, कष्टकऱ्यांचा बाजार अतिषय आनंदात पार पडला आणि सर्व काही सुरळीत सुरू राहिलं.
