मस्तूद खुन प्रकरणात माणिक उर्फ योगेश कांबळे निर्दोष
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
जुन्या वादातून सन 2015 मध्ये साथीदारांच्या मदतीने दिपक मारुती मस्तुद (रा.विठ्ठलनगर) याच्या खून प्रकरणातील संशयित माणिक उर्फ योगेश बळीराम कांबळे (रा. हनुमाननगर तारदाळ) याची येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितातर्फे अॅड. मेहबूब बाणदार यांनी काम पाहिले.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, मयत दिपक याचा संशयित माणिक कांबळे याच्या कुटुंबियांशी असणार्या जुन्या वादातून विधीसंघर्ष बालकाकरवी दिपक यास 31 ऑगस्ट 2015 रोजी रात्रीच्या सुमारास घरातून बोलावून घेऊन खंजीरे इस्टेटच्या रिकाम्या जागेत लोखंडी पाईपच्या सहाय्याने खून केल्याप्रकरणी संशयित माणिक कांबळे, अजित वाघमारे विधीसंघर्षग्रस्त बालक अशा तिघांवर मयताचे वडिल मारूती मस्तूद यांच्या फिर्यादीवरुन शहापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान संशयीतांपैकी अजित वाघमारे हा मयत झाला तर एकजण विधी संघर्षग्रस्त असलेने माणिक कांबळे याच्या विरोधातच सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे फिर्यादी, मयताची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, निवेदन जप्तीवरचे पंच अशा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. बचाव पक्षातर्फे शेवटचे एकत्र पाहिलेले साक्षीदार नाहीत, हेतू सिध्द होत नाही, उलटतपासात पूर्वीचे कोणतेही भांडण नव्हते हे साक्षीदारांनी कबूल केले, प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नाही, परिस्थितीजन्य पुरावा सिध्द होत नाही असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. मेहबूब बाणदार यांनी मांडला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयीत माणिक कांबळे याची निर्दोष मुक्तता केली. सदर कामी अॅड. बाणदार यांना अॅड. रचना पाटील, अॅड. सानिया दानवाडे, अॅड. शितल शिरढोणे, अॅड. अशपाक देसाई, अॅड. सिकंदर शेख, अॅड. साक्षी घोरपडे यांनी सहाय्य केले.
