मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आपण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्र मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांनी मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी ठिय्या मांडत रस्ते अडवण्याचा आणि धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर कोर्टाने जरांगे यांना आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील आंदोलकांना बाहेर काढावं, असंही कोर्टानं म्हटलं. यानंतर मुंबई पोलीस ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करावं, असं नोटीशीत म्हटलं आहे. एकीकडे जरांगे यांना नोटीस बजावली असताना, मराठा आंदोलकाविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जुहू परिसरातील एका प्रकरणात मराठा आंदोलकांवर हा गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. यानंतर मराठा आंदोलकांनी हाणामारीत बसच्या काचा फोडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुंबई लोकल ट्रेनमध्ये मराठा आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसत आहे.
