नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
ऑस्ट्रेलियाचा स्टार स्विंग बॉलर मिचेल स्टार्क याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टेस्ट क्रिकेट आणि वनडे वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार्कने निवृत्ती घेतली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी स्टार्कने निवृत्ती घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशातच आता स्टार्क पाठोपाठ आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.
पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या 79 आंतरराष्ट्रीय व्हाईट-बॉल मॅचच्या करिअरमध्ये, आसिफ अलीला त्याच्या बेफिकीर फलंदाजीसाठी अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. 33 वर्षांच्या आसिफने पाकिस्तानसाठी 58 टी-ट्वेंटी आणि 21 एकदिवसीय मॅच खेळल्या. त्याची सर्वात अविस्मरणीय खेळी 2021 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होती, जिथे त्याने फक्त सात बॉलमध्ये 25 धावा करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
ट्विटरवर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना आसिफ म्हणाला, ”पाकिस्तानची जर्सी घालणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण होता.” त्याने आपल्या कुटुंबीयांचे आणि मित्रांचे आभार मानताना म्हटलं की, ”जे माझ्या सुखदु:खात माझ्यासोबत उभे राहिले, विशेषत: वर्ल्ड कपच्या वेळी जेव्हा मी माझ्या मुलीला गमावले, तेव्हा तुमची साथच माझ्यासाठी ताकद बनली.”
आसिफने टी-ट्वेंटी मध्ये एकूण 577 धावा केल्या, ज्यात 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 41 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. एकदिवसीय मॅचमध्ये त्याने 382 धावा केल्या, ज्यात 21 सिक्स आणि 22 फोरचा समावेश आहे. त्याचा शेवटचा एकदिवसीय मॅच 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला, तर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय मॅच 2020 च्या आशिया गेम्समध्ये होता.
