मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मराठा आंदोलकांना महत्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.
आझाद मैदान आणि परिसरात आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी नागरी सेवा सुविधा पुरविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत आहे. तथापि, स्वच्छता वाहने, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आदी वाहनांना या परिसरात ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही तसेच आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेले शौचालय स्वच्छ आणि सुस्थितीत राहतील, याची काळजी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरवलेल्या थैल्यांमध्ये कचरा टाकावा. तसेच आंदोलनस्थळ आणि परिसरात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
एक हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत–
आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनकर्त्या बांधवांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन दल, वैद्यकीय सुविधा आदी विभागांचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात अविरतपणे कार्यरत आहे. स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातून किमान 30 कर्मचारी आणि पर्यवेक्षक याप्रमाणे मिळून हजाराच्या घरात आज (दिनांक 1 सप्टेंबर 2025) आझाद मैदान आणि परिसरात कर्मचारी कार्यरत आहेत.
महानगरपालिकेकडून आंदोलनकर्त्यांना आवाहन–
दरम्यान, आझाद मैदान आणि परिसरात आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आलेले नागरिक आणि त्यांनी आणलेली वाहने लक्षात घेता, मैदान आणि परिसरात स्वच्छता सेवा पुरवणारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी ये-जा करणाऱ्या रूग्णवाहिका, पाण्याची सुविधा पुरविणारे टँकर आदी वाहनांना मार्ग मोकळा मिळाल्यास सर्व सोयी-सुविधा अधिक सक्षमपणे पुरविता येऊ शकतात. या पार्श्वभूमीवर, अशा सर्व वाहनांना ये-जा करण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि त्यांच्यासाठी मार्गक्रमण करणे सोपे जाईल, यासाठी आंदोलनकर्त्या बांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.
आंदोलकांना स्वच्छता बॅग पुरवल्या–
तसेच, मोठ्या संख्येने महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आंदोलनस्थळ आणि परिसरात कार्यरत आहेत. सर्व कर्मचारी अखंडपणे संपूर्ण परिसरात स्वच्छता करत आहेत. त्यादृष्टीने आंदोलकांना देखील स्वच्छता थैल्या (डस्टबिन बॅग) पुरवण्यात आल्या आहेत. या स्वच्छता थैल्यांमध्ये कचरा टाकावा. आंदोलनकर्त्या बांधवांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसाधनगृहांची देखील सातत्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात आहे. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी 5 सक्शन मशीन कार्यरत आहेत. तथापि, आंदोलनकर्त्या बांधवांनीदेखील ही प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच इतरांच्या वापरासाठी सुयोग्य ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
स्वच्छता- स्वच्छतेच्या कार्यवाहीसाठी संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता कर्मचारी हे आंदोलन परिसरात नेमण्यात आले आहेत. दिनांक 29 ऑगस्ट 2025 पासून आंदोलनस्थळ आणि परिसरात आतापर्यंत एक हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वच्छता सेवेसाठीचे योगदान दिले आहे. मैदान परिसरात कीटक व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सातत्याने धुम्रफवारणी करण्यात येत आहे. यासाठी एकूण 6 (चमू) टीम अविरतपणे कार्यरत आहे.
वैद्यकीय सुविधा- आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी आझाद मैदान परिसरात 24 तास वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत आहे. हजारो आंदोलनकर्त्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. 31 ऑगस्ट 2025 या एका दिवसात 577 रूग्णांनी वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. तर काही रूग्णांना विविध कारणांमुळे नजीकच्या रूग्णालयातही पुढील वैद्यकीय उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
टँकर सुविधा- आंदोलनकर्त्यांच्या वापरासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी 25 टँकर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मैदान सुविधा- चिखल होऊ नये, यासाठी आझाद मैदानात पाच ट्रक खडी टाकण्यात आली आहे.
