मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली. मात्र, आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली होती. आता यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी नैतिक जबाबदारी आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे. एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि नुसते समजून घेणे नाही तर त्यातून मार्ग काढणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तिथे फार काही झालेले नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? असे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत काय चर्चा झाली? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काल मी गेले तेव्हा जरांगे पाटील यांना खूप थकवा आलेला होता. त्यामुळे ते आराम करत होते. आमची थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली. माझी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
अडीचशे आमदार असूनही शरद पवार केंद्रबिंदू म्हणतात
मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांच्याबाबत सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मलाही गंमत वाटते की, एकीकडे आम्हाला संपलं, संपलं असे म्हणतात. छोटा पक्ष म्हणतात आणि इतकं मोठं आंदोलन उभे राहते तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच होतात. त्यांचे 250 आमदार आहेत. तीनशे खासदार आहेत असा पक्ष शरद पवारांकडे वळतो ही कमालच आहे, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, सलग अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. 2018 साली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरक्षणाची सविस्तर मागणी केली होती आणि आरक्षण कसे देता येईल? याबाबतही आपल्या भाषणात सांगितले होते. आज ते सत्तेत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जो उपाय तुम्ही 2018 साली विधानसभेत सांगितला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
