त्रिनिदाद / महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज ॲलेक्स हेल्सनं टी-20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये 14000 धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी फक्त ख्रिस गेल आणि किरॉन पोलार्ड यांनीच ही कामगिरी केली आहे. यासह, हेल्स आता या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ख्रिस गेल सध्या टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर : जर आपण टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोललो तर ख्रिस गेलचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेलनं त्याच्या कारकिर्दीत 463 सामन्यांमध्ये 14562 धावा केल्या आहेत. या यादीत ॲलेक्स हेल्सचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेल्सनं या प्रकारात 509 सामन्यांमध्ये 14024 धावा केल्या आहेत. किरॉन पोलार्डचं नाव आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डनं आतापर्यंत 713 सामन्यांमध्ये 14012 धावा केल्या आहेत. पोलार्ड आणि हेल्स यांना आता येणाऱ्या काळात या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनण्याची संधी असेल.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज :
ख्रिस गेल : 14562 धावा
ॲलेक्स हेल्स : 14024ङ धावा
किरॉन पोलार्ड : 14012ङ धावा
डेव्हिड वॉर्नर : 13595 धावा
शोएब मलिक : 13571 धावा
ॲलेक्स हेल्सची सीपीएल 2025 मध्ये शानदार फलंदाजी : ॲलेक्स हेल्स सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (ण्झ्थ्) मध्ये ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्यानं गयाना अमेझॉन वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला. या सामन्यात हेल्सनं 43 चेंडूत 74 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकार आणि 7 मोठे षटकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेट 172.09 होता. त्याच्याशिवाय कॉलिन मुनरोनंही 30 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांच्या झंझावाती खेळीमुळं ट्रिनबागो नाईट रायडर्स संघानं 164 धावांचं लक्ष्य 17.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केलं.
अकील हुसेन सामनावीर : या सामन्यात, गयाना अमेझॉन वॉरियर्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 163 धावा केल्या. संघाकडून शाई होपनं 29 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या. त्याच्याशिवाय ड्वेन प्रिटोरियसनं 21 आणि क्विंटन सॅम्पसननं 25 धावा केल्या. ट्रिनबागोकडून गोलंदाजीत अकील हुसेननं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. या शानदार गोलंदाजीसाठी अकील हुसेनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
