मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण असून ते दिलं गेलं नाही. आरक्षणाची लेकरांची वेदना आहे. गरीब लोक हे मुंबईला आले आहेत. सगळ्या जातींचे लोक गोरगरीब मराठा समाजाची सेवा करत आहेत. राज्यातील गोरगरीब मराठा जर मुंबईत येत असतील तर आपली गाडी ग्राउंडला लावा आणि रेल्वेने आझाद मैदानला या.
तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील, असे आवाहन त्यांनी मराठ्यांना केले आहे.
महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही जेवण घेऊन मुंबईत येत असाल तर तुम्ही जिथे-जिथे पार्किंग आहेत तिथे वाटप करत येथे या. नाहीतर तिकडचे उपाशी राहतील. अन्नछत्र ज्यांनी सुरु केलं त्यातून पैसे मागू नका. गरिबांचं रक्त पिऊ नका. मी डायरेक मिडीयात नावं घेईल. मी कोणाला बोलतोय हे त्याला कळतंय. तू लोकसभेत सुद्धा पैसे लोकांकडून घेतले. तुझे डिझेल खर्च झाले त्याचा हिशोब करतो आणि तुझे पैसे देतो. तू रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले हे माहित आहे. दादा असशील का पादा असशील. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही, असे देखील त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तर उद्यापासून पाणी पिणं बंद करणार आहे, अशी घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
उद्यापासून पाणी पिणं बंद करणार मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाणी पिणे मी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे. उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलाय.
