मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
चंद्रकांत पाटील यांनी मराठा उपसमितीचा अध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन मराठा तरुणांच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या, हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी विनाकारण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नयेत, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, ते सामाजिक मागास नाहीत’, असे वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना फटकारले.
चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात पोराचं चांगल काम केलं, त्यामुळे आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो. पण तू नीट राहा, तूच मराठा उपसमितीचा अध्यक्ष होता. तू व्हॅलिटीडी रोखल्या होत्या, हे आम्हाला माहिती आहे. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको. इथून पुढे मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलू नको. इथून पुढे वचवच नको, तू फार काही लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात आहे. चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे, त्याला म्हणून काढून टाकलं, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ओबीसीतून आरक्षण हवं त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी आणि रविवारी बघा मुंबईत किती गर्दी होते, असा इशारा यावेळी मनोज जरांगेंनी दिली.
आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत . आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल, असे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील. हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडीटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही. पितृसत्ताक पद्धतीने अंमलबजावणी झाली आहे. ऐंए आरक्षण हे खरे मराठ्यांचे आरक्षण आहे. मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
