मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळावरून मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेत अनेकांवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांचा उल्लेख चिंचुद्री असा केलाय.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले कि, चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच, असा सज्जड दम देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंवर तिखट शब्दात टीका केली आहे. सोबतच उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहिणींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत सडकून टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
