Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असून, आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक गाड्यांसह मुंबईत दाखल झाल्याने दक्षिण मुंबईत तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी, आंदोलनाचा जोर वाढताना दिसत असून, परिस्थिती चिघळण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. ”मराठा मोर्चा आणि आरक्षणासंदर्भातील सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलीये.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की, ते दोघे भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण, हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला? तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझं पोरगं त्याने पाडलं. तरी तू त्याची री ओढतो. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकालेलं पोरगं आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतं. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंवर केलाय.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भाष्य केले होते. यावर राज ठाकरे म्हणाले की, मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा. मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असे त्यांनी म्हटले होते.