मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आयपीएलमधील सर्वात वादग्रस्त ठरलेली ‘स्लॅपगेट’ घटना ‘थप्पड कांड’ सगळ्यांचं माहिती आहे. त्यावेळी ही घटना खूप व्हायरल झाली होती. त्या घटनेला तब्ब्ल 17 वर्षे झाली आहेत. पण तरी तो व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ललित मोदी आणि ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी या घटनेचा जुना व्हिडीओ जगासमोर आणल्याने श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी संतापली आहे.
काय घडलं होतं त्या दिवशी?
क्लार्कच्या ाँब्दहब 23 ण्ीग्म्वू या पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी हा व्हिडीओ दाखवला. सामन्यानंतर खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देत असताना हरभजन सिंगने श्रीसंतला कानशिलात लगावली होती. त्या वेळी मैदानावरील अधिकृत कॅमेरे बंद झाले होते, मात्र सिक्युरिटी कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला. घटनेनंतर हरभजनला 11 सामन्यांचा बंदीचा फटका बसला होता.
भुवनेश्वरीचा संताप
हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर भुवनेश्वरीने इंस्टाग्राम स्टोरीतून मोदी आणि क्लार्कवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. ”तुम्हाला लाज वाटली पाहिजे. फक्त व्ह्यूज आणि लोकप्रियतेसाठी तुम्ही 2008 मधली घटना पुन्हा उकरून काढत आहात. श्रीसंत आणि हरभजन आज आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, ते वडील झाले आहेत. अशा जुन्या जखमा पुन्हा काढणं ही घृणास्पद गोष्ट आहे.”
तिने पुढे लिहिलं की, श्रीसंतने अनेक संकटांचा सामना करून नव्याने जीवन उभारलं आहे, मात्र अशा कृतीमुळे कुटुंबाला पुन्हा त्या जुन्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. ”हे फक्त खेळाडूंनाच नाही तर त्यांच्या निरागस मुलांनाही त्रासदायक ठरतं. कोणत्याही चुकीशिवाय त्यांना प्रश्नांना आणि हेटाळणीला सामोरं जावं लागतं.”
”केस चालला पाहिजे” भुवनेश्वरी
आपला रोष व्यक्त करताना भुवनेश्वरी म्हणाली, ”अशा अमानवी कृत्यासाठी तुमच्यावर खटला चालवला पाहिजे. कोणताही व्हिडीओ श्रीसंतची प्रतिष्ठा कमी करू शकत नाही. कुटुंब आणि मुलांवर घाव घालण्यापूर्वी देवाची आठवण ठेवा.”
घटनेचा अजूनही परिणाम
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये श्रीसंतने उघड केलं होतं की, अनेक वर्षांनंतर हरभजन सिंगसमोर आल्यावर त्याच्या मुलीने त्यांना नमस्कार करायला नकार दिला. यावरून या घटनेचा परिणाम अजूनही त्यांच्या कुटुंबावर कायम असल्याचं दिसून येतं.
