वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावत धक्का दिला होता. त्यांच्या या निर्णयानंतर जगभरातून नाराजीचे सूर उमटत होते. भारतावरही मोठा टॅरिफ लावत त्यांनी नाराजी ओढावून घेतली आहे. मात्र, आता त्यांच्याच देशातून त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
बहुतेक टॅरिफ कायद्यानुसार नाहीत : ट्रम्प प्रशासनानं लादलेले बहुतेक टॅरिफ कायद्यानुसार नाहीत, असे निरीक्षण अमेरिकेतील एका संघीय अपील न्यायालयानं नोंदवलं आहे. शुक्रवारी एका अपील न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बहुतेक टॅरिफ बेकायदेशीर घोषित केले आहेत. त्यामुळं हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयानं काय नमूद केलंय? : ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स द फेडरल सर्किट’ यांचं म्हणणं आहे की, ”डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले बहुतांश टॅरिफ हे बेकायदेशीर आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या परिस्थितीतले अधिकार प्राप्त आहेत, पण त्यामध्ये टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही. या निर्णयानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना फटका बसला आहे.”
निर्णयानंतर ट्रम्प यांची आक्रमक भूमिका : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले आहे की, ”सर्व टॅरिफ अजूनही प्रभावी आहेत! आज एका अत्यंत पक्षपाती अपील न्यायालयानं चुकीचं म्हटलं आहे की, आमचे टॅरिफ काढून टाकले पाहिजेत, परंतु त्यांना माहित आहे की, शेवटी अमेरिकाच जिंकेल. जर हे टॅरिफ काढले गेले तर ते देशासाठी आपत्ती ठरेल. अमेरिका यापुढे प्रचंड व्यापार तूट आणि मित्र किंवा इतर देशांनी लादलेले अन्याय्य टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ व्यापार अडथळे सहन करणार नाही, जे आमचे उत्पादक, शेतकरी आणि इतर सर्वांना कमकुवत करतात. जर त्यांना टिकून राहण्यास परवानगी दिली तर हा निर्णय अमेरिकेचा अक्षरश: नाश करेल. अनेक वर्षांपासून, आमच्या बेफिकीर आणि मूर्ख राजकारण्यांनी आमच्याविरुद्ध टॅरिफ वापरण्याची परवानगी दिली होती. आता, युनायटेड स्टेट्स सुप्रीम कोर्टाच्या मदतीने, आम्ही त्यांचा वापर आमच्या राष्ट्राच्या फायद्यासाठी करू आणि अमेरिकेला पुन्हा श्रीमंत, मजबूत आणि शक्तिशाली बनवू!”
टॅरिफमुळं संबंध ताणले : डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाचा गैरवापर करून अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध हे वाईट होताना सध्या दिसत आहेत. अमेरिकेकडून भारताबद्दल वादग्रस्त विधानं देखील केली जात आहेत.
