Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

ऑगस्टच्या मध्यावर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यानंतर ऐन गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातला .विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची हजेरी लागली . नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मन्याड नदीला पूर आला .लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेने भरलं .शेत जमीन पाण्याखाली गेली .अनेक गावांचा संपर्क तुटला .दरम्यान पुढील चार दिवस पावसाचा जोर ओसरणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय . दरम्यान आज संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .नाशिक ,धुळे, नंदुरबार, जळगावसह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्हातही पावसाचा इशारा देण्यात आलाय .

हवामान विभागाचा इशारा काय ?

सध्या अंदमान निकोबार बेटांवर वाऱ्यांचे जोरदार प्रवाह सक्रिय आहेत .हे प्रवाह आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या किनारपट्टी भागासह कोकण व गोवा भागात वेगाने वाहत आहेत .त्यामुळे ईशान्य अरबी समुद्रात वाऱ्याचा जोर वाढला आहे . त्यामुळे ताशी 40 ते 50 प्रति तास वेगाने वाऱ्याचा वेग आहे .

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकणपट्टीसह पुणे सातारा कोल्हापूर व नाशिक घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे .

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना व परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .तर पालघर, नाशिक, धुळे ,नंदुरबार ,जळगाव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार आहे .

उद्यापासून राज्यभरातलाच पावसाचा जोर ओसरणार आहे .केवळ तळ कोकणात हवामान विभागाने पावसाचे अलर्ट दिले असून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह ठाणे पालघर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे .

पावसाचा जोर हळूहळू पुन्हा वाढणार

हवामान पुणे विभागाचे माजी प्रमुख के एस होसाळीकर  यांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस 30 आणि 31 ऑगस्ट रोजी कोकण प्रदेशात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे .तर मराठवाडा आणि विदर्भ प्रदेशातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे .त्यानंतर कोकणाच्या बाजूने पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे .

31 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथा

1 सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,सातारा कोल्हापूर घाटमाथा

2 सप्टेंबर : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, घाटमाथा