मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरील आमरण उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. ”आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही,” अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप आमदार संजय केनेकर यांनी स्फोटक वक्तव्य केलंय. मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय केनेकर?
भाजप आमदार संजय केनेकर म्हणाले की, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने हे नुकसान बूमरँग होणार आहे. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे. शरद पवार हे समाजाचे नुकसान करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल. त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे यांच्यासारखे सुसाईड बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात याचे दुर्दैव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता संजय केनेकर यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठा समाजासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरु असताना राज्य सरकारने मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
