मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा-
ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाली. प्रामुख्याने ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायचं असल्यास तर कशा पद्धतीने मध्यथी करत हा प्रश्न सोडवावा, याबाबत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा…सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
