Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईच्या माझगाव परिसरात डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात, गळा दाबून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पण ही हत्या कुणी केली आणि कशासाठी केली? याबाबत पोलिसांकडून काहीच क्ल्यू नव्हता. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांत खूनाचा उलगडा केला आहे. तसेच हत्येच्या कारणाचा देखील खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या मामासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

मृत्यूंजय झा, सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय असं अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तर केशव कुमार चौधरी असं हत्या झालेल्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशव कुमार चौधरी हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. दोन आठवड्यांपासून तो मुंबईत कामाच्या शोधात आला होता आणि त्याचा मामा मृत्युंजय झा यांच्यासोबत माझगाव येथे राहत होता. केशव माझगावमधील एका निवासी इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याच्या गावातील सनी कुमार चौधरी आणि गिरधारी रॉय हे देखील याच परिसरात राहत होते.

सोमवारी रात्री, केशव हा त्याच्या मामा आणि दोन मित्रांसोबत दारू पीत बसला होता. त्याचवेळी, त्यांच्यात बिहारमधील जमिनीच्या जुन्या वादातून बाचाबाची सुरू झाली. दारूच्या नशेत हा वाद अधिकच वाढला. रागाच्या भरात मृत्युंजय आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी केशववर हल्ला केला. यावेळी मृत्युंजयने केशवच्या मानेवर पाय ठेवून त्याचा गळा दाबला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर, तिघांनी केशवचा मृतदेह सोसायटीच्या ड्रेनेज टँकमध्ये फेकून दिला. त्यानंतर सनी आणि गिरधारी भुसावळला पळून गेले, तर मामा मृत्युंजय मुंबईतच राहिला. पोलिसांनी तपास सुरू केला असता, पोलिसांना मृत्युंजयवर संशय आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 3 च्या मदतीने भुसावळला पळून गेलेल्या सनी आणि गिरधारी यांना शोधून काढले. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.