कराची / महान कार्य वृत्तसेवा
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील खोस्त आणि नांगरहार प्रांतात हवाई हल्ले केले आहेत. वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये मुलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. ही कारवाई पाकिस्तानी हवाई दलाने डुरंड रेषेजवळ केली आहे, जिथून पाकिस्तानात घुसखोरी होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि हाफिज गुल बहादुर या गटांवर होते. हे दोन्ही गट पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांत आणि सीमावर्ती भागांमध्ये सक्रिय आहेत. दरम्यान, 2021 मध्ये अफगानिस्तानमध्ये तालिबानचे पुनरागमन झाल्यानंतर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ने पाकिस्तानविरोधात घातक हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिकांचा बळी गेला आहे.
पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर आरोप करत आहे की, तालिबान सरकार तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि इतर अतिरेकी गटांना आश्रय देत आहे. तर भारतीय गुप्तचर यंत्रणाही अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असून, त्या पाकिस्तानविरोधी गटांना मदत करत आहेत, असा गंभीर आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
तर तालिबान प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते कुठल्याही दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. तसेच, पाकिस्ताननेही आमच्या (तालिबानच्या) अंतर्गत कामकाजात दखल देऊ नये, असा इशाराही तालिबान प्रशासनाने दिला आहे.
सेनाप्रमुख असीम मुनीर यांचा इशारा
पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अनेक वेळा इशारा दिला होता की, जर अफगाण तालिबानने दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवले नाही, तर पाकिस्तान स्वत: कारवाई करेल. सध्या झालेले हवाई हल्ले हा त्याच इशाऱ्याचा परिणाम मानले जात आहे. दरम्यान, तालिबान नेत्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचं हे पाऊल अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा उल्लंघन करणारे असल्यचे तालिबानच्या नेत्यांनी म्हटले आहे.
वाढता तणाव आणि युद्धाचा धोका
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने अलीकडेच पाकिस्तानमध्ये तालिबानविरोधी अफगाण गटांची बैठक आयोजित केली होती. तालिबानने हे त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा कट मानला आहे. हवाई हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
