मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नुकतंच जम्मू काश्मीर इथं झालेल्या भूस्खलनात 41 जणांचा मृत्यू आणि अनेकजण बेपत्ता असतानाच माता वैष्णो देवी मंदिर, धराली, मनाली, किश्तवाड या भागांमध्येही निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत आहे. जी वाट भाविकांना देवीच्या दारापर्यंत नेत होती, त्याच वाटेवर मृत्यूनं गाठल्यानं आता स्मशानशांतता पाहायला मिळत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर स्थानिक कटरावासी नागरिकानं भाष्य करत इथं विकासाच्या नावाखाली कशा पद्धतीनं निसर्गाचा ऱ्हास केला जात आहे याकडे लक्ष वेधलं.
सामान्य नागरिकानं सगळंच सांगितलं…
मुळच्या कटरा इथं वास्तव्यास असणाऱ्या एका नागरिकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी प्रकाशात आणल्य, जिथं त्यानं वेदपुराणांचा उल्लेख करत अगदी रामायणापर्यंतसुद्धा लिहिण्यात आलं आहे ती वैष्णो देवी प्रभू श्रीरामांसाठी तपश्चर्या करत आहे. आपण कलियुगात परतू तेव्हा तुमचा स्वीकार करू असं वचन प्रभू श्रीरामानं देवीला दिलं होतं. अशा स्थितीत देवीची तपश्चर्या प्रदूषण, वाहनांचे आवाज, वृक्षतोज आणि सातत्यानं होणाऱ्या बांधकामांनी भंग होत आहे. असं का सुरुय? हा खडा सवाल त्या नागरिकानं उपस्थित करत देवी क्रोधित आहे, तिच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येत व्यत्यत येत असल्यानं हे सर्व होत आहे असं तो आपल्या विश्वासापोटी बोलला.
यावेळी या नागरिकानं मंदिराच्या व्यवस्थापनावरही दोषारोपण करत इथं गर्दी वाढवण्यासाठी त्रिकुटी पर्वतावर व्यवसायच सुरू केला आहे. इथं गरिब भक्तांसाठी कोणतीही व्यवस्था नाही, असं वास्तवसुद्धा या स्थानिकानं समोर आणलं.
वैष्णो देवी मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य…
बाणगंगेपासून भैरवाथापर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असून, त्रिकुटा पर्वतावरही प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी आहे. आधी इथं झाडाझुडुपांमुळं वातावरण शुद्ध आणि स्वच्छ होतं. मात्र व्यावसायिकरणानं सारं उध्वस्त केलं. आता मंदिर व्यवस्थापन आणि सरकारला जर जाग आली नाही, तर मोठा अनर्थ कोणीच टाळू शकत नाही अशी चिंता व्यक्त करत इथं देवीच नसेल तर लोक काय पाहायला येणार? हा उद्विग्न प्रश्न या स्थानिकानं मांडला.
देवस्थानांचं व्यावसायिकरण होतंय?
वैष्णो देवीमंदिर परिसरामध्ये घडलेल्या या दुर्घटनावजा नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक स्तरांतून मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्रिकुटा पर्वतावर होणारं बांधकाम कितपत योग्य आहे, इथं गर्दी वाढवण्यासाठी केली जाणारी वृक्षतोड योग्य आहे का? या पर्वतांवर मालवाहू डिझेल वाहनांना परवानगी देणं योग्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र अद्यापही अनुत्तरित आहेत हीच शोकांतिका.
