नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
नांदूर नाका परिसरात दोघा युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद आहे. यात भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्यांनीच गुंड व मुलांना बरोबर घेऊन स्वत: त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते, राहुल दराडे, दिलीप मोरे, वैभव ठाकरे, मसूद जिलानी, बाळासाहेब कोकणे, संजय गोसावी, आकाश धोत्रे तसेच जखमी युवकांच्या धोत्रे व कुसाळकर परिवारातील सदस्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत निवेदन सादर केले.
उद्धव निमसेंवर कारवाई नाहीच
शिवसेना ठाकरे गट व पीडित कुटुंबीयांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे, 22 ऑगस्ट रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण नोंद झाली असून भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनीच गुंडांना व मुलांना बरोबर घेऊन स्वत: त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही, यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते.
फिर्यादीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या
फिर्यादीच्या कुटुंबावर सध्या राजकीय दबाव व गुंडांचा दबाव टाकण्यात येत आहे, त्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. ही घटना अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीने स्वत: हल्ल्यात सहभागी होणे हे लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांना आश्रय देणे आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असह्य आहे.
तर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की, माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या हल्ल्यात सहभागी सर्व साथीदारांवरही तत्काळ कारवाई करण्यात यावी. फिर्यादीच्या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. राजकीय दबावाला बळी न पडता ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. आडगाव व परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. मागण्या तत्काळ पूर्ण झाले नाही, तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
