मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
क्रिकेट आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. 14 सप्टेंबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. इतर कोणत्याही सामन्यापेक्षा या सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. सामना सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हा तोच हारिस रऊफ आहे, ज्याला टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विराट कोहलीने दोन चेंडूत दोन षटकार ठोकत सामना पूर्णपणे पलटवून टाकला होता. यातलं एक षटकार तर आयसीसीनेदेखील सामन्यानंतर ‘आयसीसी शॉट ऑफ द सेंच्युरी’ म्हणून सन्मानित केले.
भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आशिया कपच्या गट-अ मध्ये आहेत. त्यामुळे 14 सप्टेंबरला एक सामना निश्चित आहे. मात्र या दोघांमध्ये दोन सामने होण्याची शक्यता जास्त आहे. इतकंच नव्हे तर जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर चाहत्यांना तीन सामने पाहायला मिळतील. भारत आणि पाकिस्तानसोबत या गटात ओमान आणि यूएई आहेत. त्यामुळे काही मोठा उलटफफेर झाला नाही, तर सुपर-4 फेरीतही भारत-पाकिस्तानची टक्कर होणार हे जवळपास निश्चित आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल हरिस रौफ काय म्हणाला?
तिरंगी मालिकेसाठी यूएईमध्ये पाकिस्तान संघासोबत सराव करणाऱ्या उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हरिस रौफचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमधील दाव्यानुसार, रौफला विचारण्यात आले की भारत आणि पाकिस्तान आशिया कपमध्ये दोनदा भिडू शकतात का? यावर रौफने उत्तर दिले, ”दोन्ही आपले आहेत. इन्शाअल्लाह.” म्हणजे त्याला वाटत आहे की, पाकिस्तान दोन्ही सामने जिंकले.
आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी यंदा आशिया कप 2025 टी-20 स्वरूपात होणार आहे. या फॉरमॅटमधील आशिया कपची ही तिसरी आवृत्ती आहे. यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान टी-20 आशिया कपमध्ये 3 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने 2 वेळा आणि पाकिस्तानने 1 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय, आशिया कपच्या एकदिवसीय स्वरूपात दोघेही 15 वेळा एकमेकांसमोर आले आहेत, त्यापैकी भारताने 8 वेळा आणि पाकिस्तानने 7 वेळा विजय मिळवला आहे.
