मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी राज्य सरकारने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वाटाघाटींना आणि चर्चेला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ध्एऊ) राजेंद्र साबळे हे मंगळवारी सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. राजेंद्र साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून मनोज जरांगे पाटील यांना मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली जाईल, अशी चर्चा होती.
उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून पुढे टाकले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडींनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, आपली आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काहीच चर्चा झाली नाही, असे जरांगे यांनी म्हटले. आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. हजार रस्ते आहेत, त्यापैकी एक द्या. मी मोर्चावर ठाम आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.
