Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. अशात, गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल. त्यातच मनोज जरांगे आंदोलनसाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. याचदरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईतील मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनोज जरांगे काय म्हणाले?

राजेंद्र साबळे यांच्या भेटीनंतर देखील मनोज जरांगे मुंबईतील मोर्चावर ठाम आहे. अजून बोललोच नाही. तुमच्या समोरच चर्चा करणार, असं मनोज जरांगेंनी सांगितले. एक रस्ता आम्हाला द्या..कोणताही द्या…हजार रस्ते आहेत. एक द्या..मी मोर्चावर ठाम..अंमलबजावणी पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. माझ्या लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चर्चा नाही, अंमलबजावणी करा…, असं मनोज जरांगे म्हणाले.  तीन महिन्यांचा वेळ द्या म्हणाले होते. परंतु उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत निघणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

देवेंद्र फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी काय म्हणाले? उद्या राज्यभरात गणपतीचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील 10 दिवस हे गणेशोत्सवाच्या धामधुमीचे असतील. या काळात मराठा मोर्चा मुंबईत आल्यास पेचप्रसंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी स्वत:हून पुढे टाकले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. मी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या मोर्चाचा मार्ग जाणून घ्यायला आलो होतो. त्यांची यासंदर्भात काय अडचण आहे, हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो होतो, असे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी सांगितले.