Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

जिल्ह्यात संपूर्ण राजकीय मैदान मारण्यासाठी महायुती सज्ज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसहीत ‘गोकुळ’मध्येही सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असं आवाहन कोल्हापूरचे खासदार धनंजय (मुन्ना) महाडिक यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केली. यावेळी त्यांनी सतेज (बंटी) पाटील यांच्यावर निशाणा साधला.

जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्‌‍यावर राजकीय वतुर्ळात बंटी विरुद्ध मुन्ना चर्चा चांगलीच रंगली आहे. मुन्ना महाडिक म्हणाले की, ”महादेवी हत्तीण प्रकरण आणि सर्किट बेंचच्या स्थापनेत कोल्हापूरची एकजूट दिसली. पण चांगल्या कामाला जाणीवपूर्वक विरोध केला जातो. कोल्हापूरात विमानतळ होणार, असे आम्ही सांगत होतो, त्यावेळी माजी पालकमंत्र्यांनी ‘महाडिकांचं विमान कुठे घिरट्या घालतंय बघा, असं म्हणत आमची खिल्ली उडवली होती’, आता कोल्हापूराचं विमान देशात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आहे”, असा दाखला देत मुन्ना महाडिकांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुन्ना महाडिक पुढे म्हणाले की, ”गोकूळ दूध संघाला काही मंडळींकडून घरघर लावण्याचा प्रयत्न केला जातोय. महायुतीचा अध्यक्ष असूनही तेथे पूर्ण सत्ता नाही”, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोल्हापूरात भरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूरात सर्किट बेंच झाल्यामुळे आता विकासाचे महाद्वार खुले झाले आहे. या सर्किट बेंचचे खंडपीठात रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दहा ते पंधरा दिवसांत प्रस्ताव सादर करणार असल्याचेही खासदार मुन्ना महाडिक यांनी सांगितले.