मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पहायला मिळतंय. वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्य आरोपी सुरज ठोंबरे फरार
मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी पाच गोळ्या झाडून भर रस्त्यात हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी सुरज ठोंबरे याला अटक केली होती. अशातच आता जामीन मिळाल्यानंतर मुख्य आरोपी सुरज ठोंबरे फरार झाल्याचं पहायला मिळत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज ठोंबरे याला पुणे शहरात न येण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता.
200 जणांचा जमाव अन…
आज पतीत पावन संघटनेमधे जाहीर प्रवेश करण्यासाठी ठोंबरे काही तडीपार आरोपी आणि जामीनावर असलेले गुन्हेगार असा सुमारे 200 जणांचा जमाव घेऊन संभाजी महाराज पुतळा येथे आयोजित कार्यक्रमात हजर होता. पोलिस त्या ठिकाणी पोचले, त्यावेळी ठोंबरे फरार झाला. यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
3400 पानांचे दोषारोपपत्र
दरम्यान, कोयत्याने वार करण्याचा प्लॅन तयार केला गेला होता. मात्र, कोयत्याने मारणं शक्य नसल्याने पिस्तुल आणलं अनब तयारी केली गेली. पोलिसांनी तपास पुर्णकरून मोक्कानुसार 3400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. आरोपींकडून 8 पिस्तूल, 13 जिवंत काडतूसे, 7 कोयते, 7 दुचाकी 3 कार जप्त केल्या होत्या. वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी अभिषेक खोंड आणि संगम वाघमारे या दोघांनी मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरून 8 पिस्तुले, 21 जिवंत काडतुसे विकत आणली होती.
