Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या उत्कर्ष पॅनलचा पराभव झाल्यानंतर मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मी ठाकरे बंधूंना बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाची फ्रेम करुन पाठवणार आहे. त्या फ्रेममध्ये फक्त भोपळा असेल, अशी खोचक टिप्पणी आशिष शेलार यांनी केली. सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मतचोरीच्या आरोपावरुन जोरदार टीका केली.

राज ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटले की, राज ठाकरे मतचोरीचा आरोप करतात. मग विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांची मतं महेश सावंत यांनी चोरली आहेत का? मनसेचे मुंबई विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरे यांनी केली आहे का, याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरुन ठाकरे गटाकडून रडगाण्याचा बँड का वाजवला जात आहे? हिंमत असेल तर उबाठाने एकट्याने लढून दाखवावे, असेही त्यांनी म्हटले.

बेस्त पतपेढीच्या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आला नव्हता. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणे उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनलला 7 जागांवर विजय मिळाला होता. भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती केंद्रीय भाजपच्या निर्णयानंतर रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. मुंबई भाजपसाठी हा नवीन अध्याय सुरु झाला आहे. अमित साटम यांनी नगरसेवक, आमदार आणि तळागळातील कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. एक तरुण चेहरा मुंबई भाजपचा अध्यक्ष होतोय, याचा आनंद आहे. मूळ कोकणाची नाळ असलेला आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता अध्यक्ष झाला आहे. नागरी चळवळीतून उदयोन्मुख चेहरा पुढे आला आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होईल त्यासाठी शुभेच्छा, असे आशिष शेलार यांनी म्हटले.