इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
पारदर्शी कारभार आणि सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या विश्वासाच्या बळावर सन्मती बँकेने अल्पावधीतच उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. परंतु अलिकडच्या काळात काही मंडळींकडून बँकेची नाहक बदनामी करण्याचा व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यावरही मात करुन तुम्हा सर्वांच्या विश्वासाच्या बळावरच बँक भविष्यात आणखीन मोठी होईल. कितीही आव्हाने आली त्यांचा सामना करण्यास बँक समर्थ असेल, असा ठाम विश्वास सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सभासदांना लाभांश निश्चितपणे मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
येथील सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीत पार पडली. त्याप्रसंगी चेअरमन सुनिल पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी विस्तृत माहिती देताना बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यात मिळून 13 शाखा कार्यरत आहेत. चालू आर्थिक वर्षात पोटनियमामध्ये बेळगांव जिल्ह्याचा समावेश करुन नजीकच्या जिल्ह्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने बँकेच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार व कर्जदार ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याचे नमुद केले. बँकेने सातत्याने ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकाला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. कितीही अडचणी आल्या तरी बँक समर्थ असल्याने कोणीही चिंता करु नये, असेही त्यांनी सांगितले.
माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, आजच्या स्पर्धात्मक युगात सहकारी बँका चालवणे आव्हानात्मक बनल्याचे सांगत कुरघोड्या करण्याची स्पर्धा वाढत चालली आहे. अर्थसहाय्य मिळाल्यानंतर कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने बँकेची बदनामी करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दृष्ट प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज आहे. कुरघोड्या करणार्यांनी संस्था उभाराव्यात आणि त्या चालवून दाखवाव्यात असे आव्हान देत माजी मंत्री आवाडे यांनी, अशी अनेक आव्हाने पेलावी लागतात. संकटांमुळे डळमळीत होऊ नका, दिलेले कर्ज कायद्याच्या चौकटीत वसुल करा. शासनाच्या विविध योजना लागू करुन त्याला सभासदांना लाभ मिळवून देताना खेकटेखोरांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करा, असे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले. बँकेचे सीईओ अशोक पाटील यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दर्शविली. याप्रसंगी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपुते, अहमद मुजावर, श्रीरंग खवरे, राहुल खंजीरे, अजित कोईक, संचालक शितल पाटील, विठ्ठल चोपडे, आण्णासो मुरचिट्टे, प्रदीप मणेरे, संजय चौगुले, महावीर यळरुटे, संदीप माळी, सौ.वसुंधरा कुडचे, डॉ.निमा जाधव, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार व सभासद उपस्थित होते. आभार व्हा.चेअरमन एम.के.कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन पार्श्वनाथ पाटील यांनी केले.
