इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित नदीवेस नाका इचलकरंजी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रावण मासाची समाप्ती करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शुभपर्वामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा नदीवेस या ठिकाणी दररोज सायंकाळी 5 वाजता भगवान शंकरांच्या विशेष स्तोत्र मंत्रांचे वाचन आणि अभिषेकाची सेवा नित्यनेमाने रुजू करण्यातआली, श्रावण महिन्याच्या सांगते प्रित्यर्थ सकाळी भूपाळी आरती नंतर रुद्र यागाची सेवा संपन्न झाली.
भगवान शंकरांच्या सर्व स्तोत्र मंत्रांचे पठण आणि हवन घेण्यात आले. त्याच बरोबर भगवान शंकरांच्या पिंडीवरती षोडशोपचारे पूजन करून दुपारी 4 वाजेपर्यंत संततधार जलाभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवरती करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता दहिभातलेपनाची सेवा भगवान शंकरांच्या पिंडीवरती करण्यात आली. या दहिभात लेपन केलेल्या पिंडीवरती श्री शिवाष्टोत्तर शतनामावली म्हणजेच भगवान शंकरांची 108 नावे वाचून 108 बिल्वपत्र वाहण्याची सेवा करण्यात आली. सायंकाळच्या 6.30 महानैवेद्य महाआरतीने आजच्या उत्सवाची आणि या संपूर्ण श्रावण महिन्याची सांगता झाली. संपूर्ण महिनाभर झालेल्या या विविध आध्यात्मिक सेवांमध्ये भाविक सेवेकर्यांनी सहभाग घेतला होता.
