मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन महत्त्वाच्या मंत्र्यासोबतच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र ‘लाडक्या बहिणीं’ची पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे याबद्दल विचारणा केली असता अजित पवारांनी थेट योजना बंद करण्यासंदर्भातील विधान केल्याचं पाहायला मिळालं.
2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींची नोंद
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर उर्वरित 11 लाख अर्जांची पात्रता तपासण्यात आल्यानंतर त्यात 7 लाख 76 हजार अर्ज छाणनीमध्ये बाद ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाने या योजनेतील सर्व पात्र लाभार्थींची ओळख पटविण्यासाठी सरकारच्या सर्व विभागाकडून माहिती मागविली होती.
कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात किती बोगस लाडकी बहिणी?
या 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’मध्ये शहरी भागातच सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 4 हजार बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख, 25 हजार 300 बोगस लाडक्या बहिणी असल्याचं स्पष्ट झालंय.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख 25 हजार 756 बोगस लाडक्या बहिणी आहेत.
छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे मंत्रीपद भूषविणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एक लाख 86 हजार 800 बोगस लाडक्या बहिणी आहेत.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बोगस लाडक्या बहिणींची संख्या एक लाख 4 हजार 700 इतकी आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख 1 हजार 400 बोगस लाडक्या बहिणी आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यात एक लाख 13 हजार अपात्र म्हणजेच बोगस लाभार्थी असल्याचं स्पष्ट झालंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात 95 हजार 500 बोगस लाडक्या बहिणी आहेत.
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये 63 हजार बोगस लाडक्या बहिणी असल्याचं स्पष्ट झालंय.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणींची संख्या 71 हजार इतकी आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लातूरमध्ये 69 हजार अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत.
अजित पवारांना प्रश्न विचारला असता संतापून म्हणाले…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा उठवणाऱ्यांच्या विरोधात सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आल्याची माहिती आता समोर आल्यासंदर्भात आता प्रतिक्रिया समोर येत आहेत.उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख चार हजार बोगस लाभार्थी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या विषयावर आज पुण्यात अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी संतापून उलट सवाल केला. थेट भूमिका न जाहीर करता अजित पवारांनी, ”…मग योजना बंद करू का?” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
