नागपूर / महान कार्य वृत्तसेवा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. त्याच आरोपांच्या आधारे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज चे अधिकारी संजय कुमार यांनी नागपूर ग्रामीणच्या रामटेक, हिंगणा मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप केलेला होता. त्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर तशा आशयाच्या पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. राज्यात भाजपा प्रणित महायुतीचे सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत आल्यानंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये अनियमितता असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयानं फेटाळल्यानंतर संजय कुमार यांच्या विरोधात रामटेकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसडीएस’चा दावा खोटा असून नागरिक आणि मतदारांची दिशाभूल करणारा आहे, अशा आशयाची तक्रार रामटेकचे तहसीलदार रमेश कोडापे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यासंदर्भात गुन्ह्याची नोंद केली आहे.
संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा : नागपूर जिल्ह्याच्या रामटेक पोलीस स्टेशनमध्ये ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीस म्हणजे सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रामटेक तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत रामटेकचं उदाहरणही दिलं होतं. रामटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कमी करण्यात आल्याचा दावा सीएसडीएस कडून सोशल मीडियावर करण्यात आला होता. चौकशीनंतर कारवाई केली जाईल – पोलीस अधीक्षक : नागपूरचे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”रामटेक पोलीस ठाण्यात तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकशी सुरू झालेली आहे. पुढे चौकशीतून काय निष्पन्न होईल, त्या आधारे कारवाई केली जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
