Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये इ.6 वी,7 वी च्या विद्यार्थिनींची पत्रलेखन कार्यशाळा संपन्न झाली. सध्याच्या मोबाईल, आंतरजाल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पत्रे हरवत चालली आहेत. शालेय विद्यार्थिनींना पत्र लेखनाची कला अवगत व्हावी. आपले विचार,संदेश योग्य व कमीत कमी शब्दात पत्राच्या माध्यमातून लिहून दुसरीकडे पोस्टाने पाठविण्यासाठी लिखित दस्तऐवज कसा असावा हे या कार्यशाळेत शिकवण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत पर्यावरण सेवा योजना (ESS) प्रशालेत राबविण्यात येत आहे. विद्यार्थिनींचा पर्यावरणीय कृतीमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण होऊन सर्वच सण-उत्सव समारंभ हे पर्यावरण पूरक व्हावेत हा विषय घेऊन छोट्या मैत्रिणींनी पत्रलेखन केले. आपल्या पालकांना उद्देशून पर्यावरण पूरक गणेशोत्सव घरी कसा साजरा करावा त्यासाठी सजगता निर्माण करणाऱ्या पत्रलेखनाचा आनंद मुलींनी घेतला.याचे मार्गदर्शन इको क्लबच्या योजना प्रमुख शिक्षिका आर.एस.रॉड्रीग्युस यांनी केले.
या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस.काजी यांनी विद्यार्थिनींना पत्रलेखनाचे महत्व व पर्यावरण पूरक गणेशोत्सव त्याचबरोबर इतरही सण कसे व का साजरे करावेत हे सांगितले.निसर्गाचे प्रदूषण व आरोग्य यांचा सहसंबंध सांगून विद्यार्थिनींनी पालकांना हा संदेश देण्याचे आवाहन केले.पर्यवेक्षक एस एस.कोळी यांनी पत्रव्यवहार कसा करावा.तसेच मायना,मजकूर,पत्ता कसा लिहावा याचे मार्गदर्शन केले.एस.एच.मुजावर ,जे. जी देशपांडे यांनी पर्यावरण पूरक प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली.कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक व्ही.व्ही. इंगवले यांच्यामार्फत सहभागी 100 विद्यार्थिनीची पत्रे पोस्टात पाठविण्यात आली.