पुणे / महान कार्य वृत्तसेवा
येत्या 19 सप्टेंबर रोजी ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाचा 3 भाग हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे मुख्य कलाकार आहेत. ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटाच्या बाबत पुण्यातील वकील वाजेद खान (बिडकर) आणि गणेश म्हस्के यांनी मा. दिवाणी न्यायाधीश पुणे यांच्या न्यायालयात हे चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी प्रकरण दाखल केलं आहे. दिवाणी न्यायाधीश पुणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून कोर्टानं अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना कोर्टात 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
‘जॉली एलएलबी 3’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात : ‘जॉली एलएलबी’चे दोन भाग पूर्वीच प्रदर्शित झालेले असून या चित्रपटाचा तिसरा भाग 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कहाणी वकील आणि न्यायालयाभोवती फिरणारी आहे. मात्र स्वतंर्त्याच्या (लिबर्टीच्या) नावाखाली चित्रपटातील कलाकार आणि निर्माते यांनी सदरील थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केले आहेत. तरी हा चित्रपट प्रदर्शित होवू नये याकरीता पुण्यातील वकील वाजेद खान (बिडकर) व गणेश म्हस्के यांनी याबद्दल दखल घेतली आहे. न्यायालयानं या दोन्ही अभिनेत्यांना, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
वाजिद खान यांनी केली चित्रपटावर टीका : याबाबत वाजिद खान यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं, ”की जॉली एलएलबी 3′ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा बॅण्ड (बो) घालून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे वकिलांची प्रतिमा मल्लिन करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर चित्रपटात वकीली व्यवसायाचा अवमान केलेला आहे. त्यामुळं आम्ही दिवाणी न्यायालयात धाव घेवून चित्रपटावर मनाई हुकूम मिळण्यासाठी धाव घेतली होती. आर. सी. एस. क्रमांक 8782024 त्यानुसार वरिष्ठ विभागातील 12 वे ज्युनियर दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांना समन्स बजावले असून त्यांना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 28 ऑगस्ट रोजी पहिली तारीख असून अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो असे मेहरबान कोर्टाने म्हटले आहे.
