इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
दि. १७/०८/२०२५ इ. रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन झाले व दि. १८/०८/२०२५ इ. रोजी उच्च न्यायालयाचे कामकाजास प्रारंभ झाला. आज कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी पहिला जामिनाचा आदेश अॅड. सचिन यशवंतराव माने यांनी दाखल केलेल्या जामिन अर्जाचे कामी झाला.
दि.११/०३/२०२३ इ. रोजी इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलगी पळून गेलेबाबत तक्रार इचलकरंजी पोलिस ठाणे येथे झाली होती. तसेच दि. १३/०३/२०२३ इ. रोजी सदर अल्पवयीन मुलीस दबावाखाली ठेवुन अतिप्रसंग केलेबाबत शाहुल कांबळे यास अटक होवुन त्याचे विरुध्द भा. द. वि. सं. कलम ३७६ (२) (J), ३७६ (२) (N), ३५४ (A) व सह पोक्सोचे कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. दि.०२/०५/२०२३ पासुन आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. त्याने अॅड. सचिन यशवंतराव माने यांचेतर्फे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे जामिन अर्ज दाखल केलेला होता. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन झालेने सदरचा जामिन अर्ज कोल्हापूर येथे सर्किट बेंचकडे वर्ग झाला व पहिल्याच दिवशी सदरचे प्रकरण बोर्डावर सुनावणीस आले. पहिल्याच दिवशी न्यायालयाचे कामकाज चालणार असलेने न्यायालयात वकीलांची गर्दी होती. सुनावणी दरम्यान आरोपी हा २ वर्षापासुन अधिक काळ कैदेत आहे, पिडीतेने अतिप्रसंगाचा आरोप घटनेनंतर ५ महिन्यांनी केलेला आहे. तसेच प्रकरण सुनावणीमध्ये कोणतीही प्रगती नाही असा युक्तीवाद आरोपी तर्फे करणेत आला. याउलट सरकार पक्षातर्फे तसेच मुळ फिर्यादी तर्फे सदरचे प्रकरण गंभीर असुन आरोपीला जामिन मंजुर झालेस पिडीतेच्या जिवाला धोका निर्माण होणार आहे असा युक्तीवाद केला. परंतु आरोपीचे वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन आरोपीस जामिन मंजुर करणेत आला. आरोपी तर्फे अॅड. केदार पाटील, अॅड. सचिन माने व अॅड.प्रतिक टारे यांनी काम पाहिले.
