पुणे / महान कार्य वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन तरुणींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित तरुणींना पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात आणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत, मारहाण केल्याचा आरोप तरुणींनी केला होता. या प्रकरणी पोलिसांवर ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी या तरुणींनी आंदोलन देखील केलं होतं. आता याच तीन तरुणींसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावणाऱ्या तीन मुलींपैकी दोन मुली, श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील पोलीस आयुक्तालयात कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत इर सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं. त्यामुळे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर हे देखील रात्रभर उपस्थित होते. मात्र यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
नेमकं प्रकरण काय होतं?
1 ऑगस्टला हा सगळा प्रकार समोर आला होता. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. तुम्ही किती मुलांसोबत झोपलात? तुम्ही लेस्बिअन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले होते, असा आरोप तीन मुलींनी केला होता. याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं होत. आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली. मात्र पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला होता.
कोथरूड पोलिसांच्या विरोधात या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयात 3 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपासून रात्री तीन वाजेपर्यंत पीडित दोन मुली त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारी श्वेता पाटील, परिक्रमा खोत, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर त्यांचे इतर 50 ते 60 सहकारी पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता. या संपूर्ण प्रकरणी कोणत्याही तथ्य आढळले नसल्याचे संपूर्ण घटना इंडोर घडल्याचं पत्र पुणे पोलिसांनी या सगळ्यांना दिलं होतं. मात्र श्वेता पाटील यांनी हे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकलं होतं. त्यानंतर दोन मुलींचे वैद्यकीय अहवाल समोर आले होते. त्यात मारहाण केल्याच्या कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नसल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
