Spread the love

लातूर / महान कार्य वृत्तसेवा

लातूर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपलंय. उदगीर तालुक्यातील बोरगाव गावात रात्री पुराचे पाणी शिरल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ग्रामस्थांचे संसार उध्वस्त  झाले आहेत. पुराच्या पाण्यात 70 शेळ्या, 7 बैल, 5 म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकप वाहन वाहून गेले आहे. हजारो एकर शेती खरवडून गेली असून उभं पीक पाण्यात गेलंय. गावातील अंगणवाडी केंद्र घरे किराणा दुकाने गोठे पाण्याखाली गेले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

रात्री झालेल्या पावसाने लेंडी नदीला पूर आला असून धडकनाळ व बोरगाव या गावांमध्ये पाणी शिरलंय. बोरगावने अक्षरश: तळ्याचे रूप धारण केलं असून गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेला आहे. रात्री दोन वाजल्यापासून गावकऱ्यांनी आहे त्या अवस्थेत रात्र काढली. उदगीर मुख्रमाबाद देगलूर रस्ता पूर्णपणे बंद झालाय. धडकनाळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

बोरगाव गावाला पाण्याचा वेढा

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने अक्षरश: उध्वस्त केलं. गावात पाणी शिरल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांचे संसार उद्ध्‌‍वस्त झाले आहेत. पुराच्या पाण्यात 70 शेळ्या, सात बैल, पाच म्हशी, दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले. हजारो एकर शेती खरवडून गेली असून उभं पिकं पूर्णपणे नष्ट झालं आहे. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन, पाईपलाईन, गुरं-ढोरं आणि इतर शेतीसंबंधी साहित्य वाहून गेल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे.

गावातील अंगणवाडी केंद्र, घरे, किराणा दुकाने, गोठे पाण्याखाली गेले. कपडे, धान्य, किराणा आणि घरगुती साहित्य पूर्णपणे खराब झालं आहे. गावातील साडेतीन हजार लोकसंख्येत शेकडो नागरिकांना आपली घरं सोडून मंदिरात आश्रय घ्यावा लागला. ”अशा प्रकारचा पाऊस व एवढं मोठं नुकसान आम्ही कधीच पाहिलं नव्हतं,” असा गावकऱ्यांचा सूर आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व भाजपा नेते पंडित सूर्यवंशी यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून, ”पूरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात गेलं आहे. गाव उद्ध्‌‍वस्त झालं असून शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावं,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहतुकीवरही मोठा परिणाम

उदगीर तालुका आणि अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. नदी-नाले व ओढ्यांना पूर आल्याने अनेक पुलांवरून पाणी वाहत असून प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतूक बंद केली आहे.

उदगीर-देगलूर मार्ग : करजखेल पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद.

उदगीर-हानेगाव मार्ग : हंगरगा गळसुबाई तांडा पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद.

उदगीर-होकर्णा / बोंथी मार्ग : भवानी दापका पूल पाण्याखाली.

माणकेश्वर-उदगीर मार्ग : इंद्रराळ पूल पाण्याखाली.

अहमदपूर-अंधोरी मार्ग : मुसळधार पावसामुळे बंद.

लातूर-नांदेड-कर्नाटक सीमारेषेवरील धडकनाळ गाव सध्या प्रचंड पाण्याच्या विळख्यात आले आहे.

    1 किलोमीटरहून अधिक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली.

    उदगीर-मुक्रमाबाद-देगलूर मुख्य रस्ता धडकनाळजवळ ठप्प.

    लेंडी नदीला आलेल्या तुफान पुरामुळे गावांमध्ये पाणीच पाणी.

    शेतशिवारावरून गेलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

हे दृश्य अक्षरश: धडकी भरवणारे असून पाण्याचा जोर एवढा प्रचंड आहे की कुणालाही त्यात अडकण्याचा धोका मोठा आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रशासनाची सूचना

प्रशासनाने नागरिकांना ”अनावश्यक प्रवास टाळा, पर्यायी मार्ग वापरा” असे आवाहन केले आहे. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने केवळ सूचना न देता तातडीने मदतकार्य सुरू करावं, अन्यथा शेतकरी व नागरिक आणखी अडचणीत सापडतील.