आळते येथे सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न
विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
प्रत्येक महिलेच्या हाताला काम देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली जाईल. त्याचप्रमाणे महिला बचत गटांना विविध व्यवसायात संधी देवून गटातील प्रत्येक महिलेला उद्योजक बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल . अशी ग्वाही आमदार डॉ. अशोकराव माने यांनी दिली . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्रती अभियान अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सभेच्या मेळाव्यात आळते (ता. हातकणंगले) येथे ते बोलत होते . मेळाव्यास सात गावातील ४३० बचत गटाच्या जवळपास एक हजार महिला उपस्थित होत्या.
आमदार डॉ. माने म्हणाले , हातकणंगले तालुक्यातील बचत गटातील प्रत्येक महिलेने प्रामाणिकपणे काम करून ताठ मानेने जगले पाहिजे . तसेच तालुक्याचे अभियान व्यवस्थापक , तालुका व्यवस्थापक व बचत गटाच्या प्रमुख यांनी बचत गटांची यादी तयार करून द्यावी. त्यानंतर प्रत्येक बचत गटांना एकत्र करून जिल्हा परिषद बचत गटाचे अधिकारी , बँकेचे अधिकारी व बचत गटांचे समन्वयक व संबंधित अधिकारी यांना एकत्र आणून लवकरात लवकर मेळाव्याच्या माध्यमातून बँकेकडून तात्काळ अर्थसहाय्य मिळवून दिले जाईल असे सांगितले.
माजी जिल्हा परिषद अरुण इंगवले म्हणाले , महिलांच्या हातात थेट पैसा उपलब्ध व्हावा यासाठीच बचत गटाची योजना आणली आहे . तसेच बचत गटांना कार्यालय लवकरच उपलब्ध करून दिले जाईल . यावेळी हातकणंगले तालुका अभियान व्यवस्थापक कृष्णात ठोंबरे यांनी अभियान संकल्पनेची माहिती दिली.
मेळाव्यात आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले , माजी उपसरपंच शितल हावळे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी आळतेचे उपसरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच फैयाज मुजावर, उद्योजक विनोद पाटील, कृषी व्यवस्थापक मनीष हावळे सचिव चेतना पाटील, कोषाध्यक्ष रुपाली देसाई, तालुका व्यवस्थापक तृप्ती कांबळे, रेश्मा गायकवाड , सर्व सी.आर. पी. कृषी व पशु सखी यांच्यासह मजले , लक्ष्मीवाडी , बिरदेववाडी , नरंदे , सावर्डे व कापूरवाडी गावचे सरपंच , उपसरपंच , सदस्या महिला व अन्य महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता . मेळाव्याचे स्वागत प्रास्ताविक प्रभाग समन्वयक राजश्री पाटील यांनी केले. तर आभार प्रभाग अध्यक्ष परवीन मुजावर यांनी मानले.
