मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 556 पुनर्वसित सदनिकांचे आज (14 ऑगस्ट) वितरण करण्यात आले. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आणायचा असून याचं उत्तम उदाहरण वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एक लाख घरे आपण गिरणी कामगारांना देत आहोत. पोलिसांची घरे 50 लाखांवरून 15 लाखांवर आपण आणलं असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आज अतिशय चांगला दिवस आहे. 556 सदनिकांच वितरण समारंभ पार पडत आहे. उद्या झेंडा आपल्या घरावर फडकवा, असे आवाहन शिंदे यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, पुढील 12 वर्ष मेन्टेनन्स फ्री असणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही. आज चाळीतून आपण टॉवरमधे जात आहात. महायुतीचं यश आहे. आम्ही आमचा अजेंडा केवळ विकास ठेवला आहे. पुढील दीड वर्षात तुम्हाला मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, मागील अडीच वर्षात मेट्रो काम कसं सुरू होतं हे तुम्ही पाहिलं आणि त्यानंतर आम्ही स्पीडने कामाला सुरुवात केली. मला डब्यात असणारे एमएसआरडीसी खात दिलं होतं. देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते. मात्र, त्यानंतर या खात्याने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, मुंबई आणि एमएमआरमधे महायुती सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. एक टक्का स्टॅम्प ड्युटी केली आहे. लाडक्या बहिणीमुळे हे सगळं झालं आहे. घर कुणीही विकणार नाही, एवढं मोठे घर कोण विकेल? असे ते म्हणाले.
बीडीडी चाळीने सामाजिक राजकीय आंदोलने पाहिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळीने सामाजिक राजकीय आंदोलने पाहिली. स्वातंत्र्याची चळवळ पाहिली आहे. 100 वर्षांचा इतिहास पाहिला तर चाळींच्या भिंतीत अनेक कथा कहाण्या आहेत. तीन चार पिढ्या इथं गेल्या आहेत. त्यामुळे चाळींचा पुनर्विकास व्हायला हवा असं आमच म्हणणं होतं. बीडीडी धे माझी मोठी सभा झाली होती. त्यावेळी अनेकांच्या घरी गेलो त्यावेळी काय अवस्थेत लोक राहत आहेत हे मी पाहिलं. झोपडपट्टी पेक्षा वाईट परिस्थिती होती. महायुती सरकार आल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. 90 वर्षांचे अतिक्रमण त्याठिकाणी होते ते देखील काढण्यात आलं. कोणीतरी बिल्डर याचा विकास करेल म्हणून हा प्रोजेक्ट पडून होते. त्यावेळी विकासक याचा उद्देश त्याला किती विक्रीसाठी फ्लॅट मिळेल हा उद्देश होता. त्यामुळे आम्ही म्हाडाला बिल्डर केलं आणि आपण 500 चौ फुटाचा फ्लॅट आपण दिला.
