मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, डॉलर निर्देशांकातील कमजोरी आणि सप्टेंबरमध्ये फेड रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता वाढल्यानं गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 92,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर 1,14,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 5 सप्टेंबर 2025 ला संपणाऱ्या सोने वायद्याचे एका तोळ्याचे दर 0.03 टक्क्यांनी वाढून 100219 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 5 सप्टेंबरला संपणाऱ्या चांदीच्या वायद्याच्या दरात देखील 0.17 टक्क्यांची वाढ होऊन ते एक किलोसाठी 115220 रुपयांवर पोहोचले आहेत.
देशातील विविध शहरातील सोन्याचे दर
मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि कोलकाता या सारख्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 101340 रुपयांर पोहोचले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 92890 रुपयांवर पोहोचला आहे. अहमदाबाद आणि पाटणा शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर 101390 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 92940 रुपये झाला आहे.जयपूरमधील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 101490 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 93040 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळाले. सोन्याच्या या वाढत्या किमतीला अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबरमध्ये व्याज दरांमध्ये कपात होण्याचे संकेत असल्यानं बळ मिळालं. महागाईचा दर कमी झाल्यानं डॉलरवर दबाव देखील वाढला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 3,367.53 डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते. तर, अमेरिकेतील सोने वायदे 0.3 टक्क्यांनी वाढून 3416.70 डॉलर वर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या डॉलरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्यानं इतर चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्यांसाठी सोनं महागलं आहे.
अमेरिकेचा 10 वर्षांच्या ट्रेजरी यील्ड एका आठवड्याच्या निचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ वाढवलं जात असल्यानं पुढच्या महिन्यात व्याज दरात कपातीच्या अपेक्षा वाढल्या आङेत. ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता आहे.
