मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 22 जुलैला राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती. या करवाईला महिना होत नाही तोच सूरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा संधी दिल्याने छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, अशी टीका विजय घाडगे यांनी केली आहे. सूरज चव्हाण यांचे पुन्हा राजकीय पुर्नवसन करण्यात आले. हे नक्कीच अजित पवारांच्या भूमिकेस योग्य नाही, असंही विजय घाडगे यांनी सांगितले.
सुनील तटकरेंना विरोध करणार– विजय घाडगे
मला झालेल्या मारहाणीला अवघा एक महिनाही झाला नसताना सुरज चव्हाण यांना अशा पद्धतीने प्रमोशन देणे योग्य आहे का? अशी मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. मग अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांचे केलेले पुर्नवसन आहे का?, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. सुनील तटकरे यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना नक्कीच छावा विरोध करेल, असे संतप्त मत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत मोबाईलवर रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दरम्यान, लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
कोण आहे सूरज चव्हाण?
1) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सध्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
2) सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जातात.
3) एकत्रित राष्ट्रवादीत महाराष्ट्र युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सूरज चव्हाण यांनी पार पाडली आहे.
4) सूरज चव्हाण हे मुळचे लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळचे रहिवासी आहेत.
5) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या 10 मध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज चव्हाण होते.
6) 2019 साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्वाची भूमिका सूरज चव्हाण यांनी बजावली होती.
