Spread the love

रायगड / महान कार्य वृत्तसेवा

माणगावमध्ये मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा महाविजय निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माणगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्यासह इतर पक्षीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व होतं. या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधत हल्लाबोल केला.

मेळाव्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. ”सुनील तटकरे यांच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिदा आहे. त्यांनी रायगडला लुबाडले, ओरबाडले आणि सरकारी जमिनी लाटल्या,” असा आरोप त्यांनी केला. ”तुमच्या सुद्धा जमिनीचा सातबारा एकदा तपासून बघा, नाहीतर तो देखील ट्रान्सफर झालेला असेल,” असा टोला उपस्थितांना लगावला. आमच्यासाठी पालकमंत्री पद म्हणजे सेवा असून ती करण्यासाठीच आम्हाला पद हवे असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले.

इतिहासातील अफजल खान वध या घटनेचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले. ”अफजल खानासोबत सय्यद बंडा होता. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार केला, पण जीवा महाले यांनी एका वारात त्याचा अंत केला. तसंच आम्हीही विरोधकांना संपवू,” असा इशारा थोरवे यांनी दिला. ”जोपर्यंत महेंद्र थोरवे आहे, तोपर्यंत भरतशेठला कोण मायचा लाल पराभूत करू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री भरत गोगावले यांनी देखील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ”आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले, हे ते विसरले असतील. पण आता त्यांची उलटी गणती सुरू झाली आहे,” असं गोगावले म्हणाले. ”शिवसेना-भाजपाच्या 4 आमदारांनी मदत केली नसती आणि आम्ही जरी थोडी मान वाकडी केली असती तरी त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता,” असा दावा त्यांनी केला.

या मेळाव्यात दोन्ही नेत्यांनी एकमुखाने तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत आगामी राजकीय लढाईत त्यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत झाल्याचा संदेशही या मेळाव्यातून देण्यात आला.