इचलकरंजी सुभाष भस्मे / महान कार्य वृत्तसेवा
पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा होणार आहे.
या शर्यतींचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक राजेंद्र काणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक दिलीप मुथा, पै. अमृत भोसले, के. व्ही. पालनकर, उदय बुगड, संग्राम स्वामी, युवराज माळी, प्रमोद बचाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकाला रोख २१००१ रूपये व शिल्ड, द्वितीय क्रमांकाला १५,००१ रूपये व शिल्ड, तृतीय क्रमांकाला ११,००१ रुपये व शिल्ड तर चौथ्या क्रमांकाला ७,००१ रूपये व शिल्ड असे बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय पहिल्या चार क्रमांकांच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीस १,००० रूपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
या स्पर्धेला रविंद्र माने, श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, के. व्ही. पालनकर, सुनिल तोडकर भैय्या, बाबासाहेब बोणे-पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी जलक्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले आहे.
