नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50ज्ञब टॅरिफ लादल्यानंतर, श्रीलंकेने आपल्या शेजाऱ्याच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. भारत-अमेरिका वाढत्या व्यापार तणावावरील संसदीय चर्चेत, कोलंबो जिल्ह्याचे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी टीकाकारांना श्रीलंकेच्या सर्वात कठीण आर्थिक दिवसांमध्ये भारताच्या उदारतेची आठवण करून दिली.
”भारतावर हसू नका. ते अडचणीत आहेत म्हणून त्यांची थट्टा करू नका कारण जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा त्यांनीच आपल्याला मदत केली होती. डाव अजून पूर्ण संपलेला नाही; अंतिम निर्णय येईपर्यंत निष्कर्ष काढू नका. आम्ही पाहिले की काही जण या गोष्टीवर हसले, पण हे हास्य अयोग्य आहे. भारताने 15ज्ञब पर्यंत टॅरिफ कमी होईल अशी अपेक्षा ठेवली होती, आणि तीच अपेक्षा आमचीही होती”, असे हर्षा डी सिल्वा म्हणाले.
त्यांच्या लढाईचा सन्मान केला पाहिजे
दरम्यान हर्षा डी सिल्वा यांनी एक्सवरही पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ”ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काविरुद्ध (टॅरिफ) भारताच्या धाडसी भूमिकेची खिल्ली उडवल्याबद्दल संसदेत सरकारचा निषेध केला. भारत, आपला खरा मित्र आहे, आपल्या कठीण काळात भारत आपल्या पाठीशी उभा राहिला. आपण त्यांच्या लढाईचा सन्मान केला पाहिजे. भारताचे धाडस आशियाला प्रेरणा देते!”
भारतावर 50 टक्के अमेरिकन टॅरिफ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतातून येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला, ज्यामुळे एकूण टॅरिफ 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भारत रशियन कच्चे तेल खरेदी करत असल्याने दंड म्हणून ट्रम्प यांनी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादले आहे.
आर्थिक संकटात श्रीलंकेला भारताची मदत
श्रीलंकेच्या समगी जना बालावेगाया पक्षाचे वरिष्ठ सदस्य आणि माजी आर्थिक सुधारणा मंत्री डी सिल्वा यांनी आर्थिक संकटाच्या काळात श्रीलंकेला स्थिर करण्यात भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. भारताने 2016 मध्ये भारतीय पाठिंब्याने सुरू झालेल्या श्रीलंकेच्या रुग्णवाहिका सेवेला 3.3 टन वैद्यकीय साहित्य पुरवले होते.
तात्काळ मदतीव्यतिरिक्त, भारताने जवळजवळ 5 अब्ज डॉलर्सची क्रेडिट लाईन्स, अनुदाने आणि कर्जे दिली. अहवालांनुसार, यामध्ये रिझर्व्ह बँकेद्वारे 400 दशलक्ष डॉलर्सची चलन अदलाबदल, 500 दशलक्ष डॉलर्सची व्यापार देणग्या आणि अन्न, इंधन व औषधे यासारख्या आवश्यक आयातीसाठी 3.1 अब्ज डॉलर्सची क्रेडिट सुविधा यांचा समावेश आहे.
आर्थिक मदतीव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठीही मदत
भारताची मदत केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नव्हती. भारताने श्रीलंकेला पेट्रोलियम उत्पादने, लोकोमोटिव्ह आणि बसेससह महत्वाच्या वस्तू देखील पुरवल्या आणि कोट्यवधी डॉलर्सच्या अनुदान प्रकल्पांना निधी दिला. या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांचे अपग्रेड, डिजिटल ओळख उपक्रम, सौर विद्युतीकरण आणि कामगारांसाठी घरे बांधण्यास मदत झाली आहे.
