Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

वसई पूर्वेतील धुमाळनगर येथे एका दुर्दैवी घटनेत 17 वर्षीय समशूल खान या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा समशूल आणि त्याचे तीन ते चार मित्र पुजा इंजिनिअरिंग समोर असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी काळाने घात केला अनब समशूलला आपला जीव गमावावा लागला.

सर्व मित्र विहिरीतून सुखरूप बाहेर आले, मात्र समशूल मात्र बाहेर आला नाही. यानंतर तातडीने स्थानिकांनी अग्निशमन दलाला बोलवलं. अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुमारे पाच तास शोधमोहीम राबवून अखेर समशूलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. तब्बल पाच तास पोलिसांची शोधमोहीम सुरू होती.

नागेश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळनगर येथील या विहिरीत नेहमीच स्थानिक मुले पोहण्यासाठी उतरतात. अनेक वेळा नागरिकांनी या विहिरीवर लोखंडी जाळी बसवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले आणि ती विहीर खुलीच राहिली. स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने एका तरुणाला जीव गमावावा लागला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून आता अधिक तीव्रतेने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे. विहिरीवर लोखंडी जाळी बसवण्यात यावी, या मागणीने आता जोर धरला आहे.