नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आता राजकारण पेटू लागले आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अटकाव केला. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याने संतप्त झालेल्या खासदारांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. खासदारांचा मोर्चा अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले. या दरम्यान काही ज्येष्ठ खासदारांसह महिला खासदारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळेंसह आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली. दिल्ली पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकांसह मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात होते. बॅरिकेड्स चढून ते ओलांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील बॅरिकेट्सवर चढून ओलांडण्याचा प्रयत्न केला.
निवडणूक आयोगावर मोर्चा कशाला?
विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ई-व्होटर लिस्टची मागणी केली आहे. त्याशिवाय, मतदानाच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणीदेखील विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला.
पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चाला अटकाव केला. मात्र, महिला खासदारांनी बॅरिकेट्सवर चढत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.
