मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गरज पडली तर आम्ही आमच्या धर्मसाठी शस्त्रंही उचलू. आमच्या धर्माविरोधात निर्णय जात असेल तर आम्ही न्यायालयाचा आदेशही मानणार नाही, अशी मुजोरीची भाषा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केली होती. या वक्तव्यावर राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि कबुतरखाना वाचवण्यासाठी आग्रही असणारे मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी त्यांच्या ( जैन मुनी निलेशचंद्र विजय) विधानाशी सहमत नाही. मी यासंदर्भात दोनवेळा बोललो आहे. मी माझी भूमिका निभावत आहे. मी आता यावर बोलणार नाही, अशी मोघम टिप्पणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, अशी टिप्पणी केली होती. यावर मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ते जे बोलतात ही समाधानाची बाबआहे. आम्ही प्रयत्न करु. आम्ही स्वयसंवेक आहोत. त्यांनी काही सांगितलं तर आमची जबाबदारी वाढते, असे लोढा यांनी म्हटले.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन जैन मुनींनी निलेशचंद्र विजय यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जैन मुनी होण्यासाठी जी सामाजिक समज लागते, ती समज निलेशचंद्र विजय यांना दिसत नाही. कबुतर हा पक्षी तुमच्या नावावर करुन घेतला आहे का? मनुष्याच्या आरोग्याला जर धोका होत असेल आणि त्याचे पुरावे जर कोर्टात दिले असतील तर त्यानुसार कोर्ट निर्णय देईल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. यावेळी किशोरी पेडणेकर शिंदे गटालाही लक्ष्य केले. संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातील कार्यक्रमाच्या बॅनरवर फक्त स्वत:चा आणि मुलाचा फोटो लावला होता. या बॅनरव एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, त्यांच्याकडे सगळे संजय असेच आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंना किंवा आनंद दिघेंना बाप मानत नाहीत. एकनाथ शिंदेंना तर मानतच नाहीत. त्यामुळे ते बॅनरवर फक्त स्वत:चा आणि मुलाचा फोटो लावतात. संजय गायकवाड स्वत:लाच बाप समजायला लागले आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
