Spread the love

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”होय मी हिंदू, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही”

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून, त्याअंतर्गत मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात शिखर काढण्याला पुजारी मंडळाचा तीव्र विरोध आहे. तर राज्य पुरातत्व विभागाने शिखर हटवण्याबाबत अहवाल दिल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अंतिम अहवालानंतर तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार आहे. आता या वादात राष्ट्रवादी शरद पवार गटाने उडी घेतली आहे. 

होय मी हिंदू आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर वाचवूया अशी साद घातली आहे. आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे आता या वादात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी हिंदू आहे. मी सनातनी आहे. हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. तुळजाभवानीची मंदिरात दररोज पूजा होते. तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत. तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत.  तुळजापूरच्या मंदिरातून तलवार गायब झाली आहे. तुळजापूरच्या मंदिराचा कळस काढण्याचा प्लॅन सुरू आहे. चला सगळे एकत्र होऊया आणि तुळजापूरचे मंदिर वाचवूया, असे त्यांनी म्हटले आहे.

तुळजाभवानी मंदिरातील तलवारीबाबत मंदिर संस्थानचा खुलासा दरम्यान, तुळजापूरच्या  तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. मंदिर संस्थानच्या खजाना खोलीत ही तलवार होती. मात्र, ती तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजाऱ्यांनी करत मंदिर संस्थानकडून आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालं नसल्याची नाराजीसुद्या व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर मंदिर संस्थाननं याबाबत लेखी खुलासा केला होता. तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार सुरक्षित असून तलवार गहाळ झाल्याची अफवा असल्याचं तुळजाभवानी मंदिर संस्थानने म्हटले होते. तलवार दैनंदिन पूजेसाठी वकोजी बुवा मठात ठेवली असल्याची माहिची संस्थानकडून जारी करण्यात आली होती.